Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

*शिक्षकाने भारद्वाज पक्षाला दिले जीवदान....

  करकंब परिसरातील अरण रस्त्यावर व्यवहारे वस्ती शाळेसमोर बहीर ससाणा याने भारद्वाज पक्षावर हल्ला करून त्याला रक्तबंबाळ करत असताना श्री नागनाथ ...

 

करकंब परिसरातील अरण रस्त्यावर व्यवहारे वस्ती शाळेसमोर बहीर ससाणा याने भारद्वाज पक्षावर हल्ला करून त्याला रक्तबंबाळ करत असताना श्री नागनाथ घाटूळे या शिक्षकांच्या प्रयत्नामुळे त्या भारद्वाज पक्षाची अतिशय विक्राळ रूप धारण केलेल्या बहीर ससाण्याच्या तावडीतून सुटका केली. भारद्वाज पक्षासाठी ही घटना म्हणजे देवदूत अवतण्यासारखी होती.श्री.नागनाथ विष्णू घाटूळे हे अतिशय प्रामाणिक आणि आदर्श शिक्षक जि.प.प्रा.शाळा लोकरेवस्ती येथे कार्यरत आहेत. गरजूंच्या मदतीला धावून जाणे हे त्यांचे वैशिष्ट्यच आहे. करकंब मधील अरण रस्त्यावर ते घाटूळेवस्ती येथे आपल्या कुटुंबासह राहतात. ते सकाळी आपल्या मुलाला घेवून शिकवणीसाठी वस्तीवरून गावात येतात. या कामानिमित्तच आज सकाळी ६.४५ वाजता  ते घरून आपल्या मुलाला घेवून निघाले. रस्त्यात व्यवहारे वस्ती शाळेजवळ त्यांना पक्ष्याच्या भांडणाचा आवाज आला. त्यांनी गाडी थांबवून इकडे तिकडे पाहिले. लक्षात काही येत नव्हते. झुडुपांच्या आडून त्यांना हा आवाज येत असल्याचे जाणवले. मुलाला उशीर होत असल्याने त्यांनी शिकवणीसाठी मुलाला सोडण्यास निघाले. गाडी चालवतानाही त्यांचे चित्त मात्र त्या आवाजाकडेच राहिले. त्यांनी मुलाला सोडले. व क्षणाचाही विलंब न करता थेट त्या झुडूपाजवळ आले. त्यांनी आवाजाच्या दिशेने झुडुपाची आतील बाजू पाहिली. बहीर ससाण्याच्या तावडीत भारद्वाज सापडल्याचे लक्षात आले. बहीर ससाण्याने अक्राळ रूप धारण केले होते. भारद्वाज पूर्णतः घाबरलेल्या अवस्थेत बहीर ससाण्याच्या टोचांचा सामना करत होता. शक्तीपुढे त्याचे काही चालेना. भारद्वाजच्या मानेला व पाठीवर ससाण्याने तीव्र जखमा केल्या होत्या. झुडुपाच्या जाळीमुळे भारद्वाजला हालचाल करता येत नव्हती. कशाचाही विचार न करता भारद्वाजला ससाण्याच्या तावडीतुन वाचवले, बहीर ससाण्याला हाकलवून दिले. रस्त्यावरून दुध वाढण्यासाठी  जाणारे शकील तांबोळी यांना हाक मारून थांबवले. त्यांच्या मदतीने भारद्वाजला बाहेर काढले. अजीर्ण झालेल्या भारद्वाज ला आजूबाजूला पाणी नसल्यामुळे तांबोळी यांच्या चरवीतील दुध पाजले. त्याच बरोबर भारद्वाजच्या जखमेला हळद आणून लावली. अक्षरश मान टाकून दिलेल्या भारद्वाज ला शिक्षक नागनाथ घाटूळे आणि शकील तांबोळी यांच्या मुळे जीवदान मिळाले. काही वेळातच भारद्वाजने परत एकदा दोन्ही पायाने उड्या मारल्या व काही वेळाने त्याने आपल्या पंखांच्या बळावर निसर्गाच्या छायेत भरारी घेतली. 

या स्तुत्य आणि संवेदनशील प्रसंगाचे करकंब परिसरातील पक्षी व वन्यजीवप्रेमी, करकंब केंद्राचे केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी, पक्षी प्रेमी महादेव पुजारी, दत्तात्रय खंदारे, शेखर कोरके, सुर्यकांत बनकर, सागर थिटे, हेमंत कदम, विजय शिंदे, लक्ष्मण जाधव, संतोष देगावकर, ज्ञानेश्वर दुधाने, सुनंदा गुळमे, अनिता वेळापूरक, विजया पवार, देवकी दुधाने, चंद्रकला खंदारे, भीमा व्यवहारे, इनामदार यांनी शिक्षक नागनाथ घाटूळे व शकील तांबोळी यांचे कौतुक व अभिनंदन केले.